उमेदवारी न मिळाल्याने नाराज नाही

मुंबई : वृत्तसंस्था । एखाद्या निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही म्हणून मी नाराज होणारा कार्यकर्ता नाही. पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी रचनात्मक कार्य करायचे असते. अशा शब्दांत माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सत्कारप्रसंगी सांगितले.

आता मला पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी कार्य करत राहणे हेच माझे ध्येय आहे, भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विनोद तावडे यांचा बोरिवली येथील अटल उद्यान येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे उपस्थित होते.

‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून मुंबई भाजप अध्यक्ष, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, शालेय शिक्षणमंत्री अशा अनेक महत्वाच्या पदांवर विनोद तावडे यांनी काम केले तावडे यांची पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे कठीण काळातही त्यांचा संयम ढळला नाही,’ असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले नाही, तेव्हा मला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अजित पवार आदींचे फोन आले, पण भाजप सोड आणि आमच्याकडे ये, असे म्हणण्याची हिंमत कुणाची झाली नाही , असे विनोद तावडे यांनी सांगितले. भुंगा लाकूड कुरतडू शकतो, पण कमळात अडकला तर त्याच्या पाकळ्या तोडत नाही, असेही ते म्हणाले.

Protected Content