उपमहापौर खडके यांनी घेतला प्रभाग १ च्या तक्रारी निपटाराचा आढावा

 

जळगाव, प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी ‘उपमहापौर आपल्यादारी’ या अभियाना अंतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रत्येक प्रभागाला भेट दिली होती. यात नागरिकांनी विविध तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या निपटाऱ्याबाबत आज उपमहापौर खडके बैठक घेऊन आढावा घेतला.

प्रभाग क्रमांक १ अंतर्गत येणाऱ्या प्रभागांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक उपमहापौर सुनिल खडके यांनी आज घेतली. याप्रसंगी प्रभाग समिती सभापती प्रतिभा पाटील, संबधीत प्रभागाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, सरिता नेरकर, दिलीप पोकळे यांच्यासह प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी आणि इतर अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित होते.

‘उपमहापौर आपल्यादारी’ या अभियाना अंतर्गत उपमहापौर यांनी महापालिकेचे पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महापालिकेच्या विविध प्रभागांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान नागरीकांनी केलेल्या तक्रारी, सुचना यांच्या करण्यात आलेल्या आणि करण्यात येत असलेल्या निपटाऱ्याचा सध्या आढावा घेतला जात आहे.  प्रभाग समिती क्रं १ अंतर्गत पुर्णत: किंवा अंशत: येणाऱ्या प्रभाग क्रंमाक १,२,५,६,७,८ व ९ मधील तक्रारी आणि कामकाजाचा यावेळी आढावा घेण्यात आला. तक्रारीच्या झालेल्या निपटाऱ्याचा तपशिल आढावा बैठकीत उपमहापौरांनी जाणुन घेतला. पाणी पुरवठा, बांधकाम, स्वच्छता, विद्युत, नगररचना आदी विभागांचे संबधीत प्रभागांतील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. नागरीकांच्या लहान सहान तक्रारी या प्रभाग समिती पातळीवरच सुटल्या पाहीजेत त्यासाठी त्यांना महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत फेऱ्या घालण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली.

आढावा बैठकीपुर्वी उपमहापौरांनी प्रभाग समिती १ च्या कार्यालयात भेट देऊन तेथील कामकाज, व्यवस्था, आवश्यक सुविधांची कमतरता यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचारी वर्गाशीही कामकाजाबाबत चर्चा केली. प्रभाग समितीतील आवश्यक गोष्टींबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आली आहे. पुढील सप्ताहात उपमहापौर खडके प्रभाग समिती २ ला भेट देऊन आढावा घेणार आहेत.

Protected Content