उद्यापासून डिजीटल वोटर कार्ड जारी होणार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्रीय निवडणूक आयोग राष्ट्रीय मतदार दिनादिवशी डिजीटल मतदान ओळखपत्र जारी करणार आहे.

२५ जानेवारीला अधिकृतपणे डिजीटल वोटर कार्ड जारी केले जाणार आहे. मतदार त्यांनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदारकार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत.

५ राज्यांमध्ये येत्या काही महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाला डिजिटल मतदार ओळखपत्र मिळू शकेल का हे पाहावे लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे नवे मतदार नोंदणी करतील त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल त्यांना १ फेब्रुवारीपासून डिजीटल वोटरकार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे नाही त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्रावर मतादाराच्या माहितीसह क्यूआर कोड देखील देण्यात येणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाँऊट तयार करावे लागेल. त्यानंतर तुम्ही डिजीटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.

Protected Content