उठा पांडुरंगा : मुक्ताईनगरात दररोज काकड आरती सोहळा !

मुक्ताईनगर –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा । संत साधुमुनी अवघे झालेती गोळा सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा || अशा काकड आरतीच्या अभंगातून तिर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथील प्रभाग क्र.१२ मध्ये  वातावरण निर्माण झाले आहे.

संताची भूमी असलेल्या मुक्ताईनगर तालुक्याचे सांस्कृतिक वैभव या काकड आरतीच्या माध्यमातून निर्माण करण्याचा येथील रहिवासी किर्तनकार ह.भ.प.सौ. दूर्गाताई संतोष मराठे यांचा संकल्प होता. त्यानुसार सत्य संकल्पाचा “दाता नारायण” होत प्रभागातील शेकडो महिला व पुरुषांनी खंबीरपणे पुढे सरसावून या काकड सहभाग नोंदवणे सुरू केले असून भल्या पहाटे ज्येष्ठ मंडळी व तरूण मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकड आरतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहेत.

मुक्ताईनगर तालुक्यासह  असंख्य वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या  श्री संत मुक्ताबाई यांच्या संत परंपरेला अनुषंगिक असे  कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर काकडा आरती सोहळा संपन्न होत असताना, रोज पहाटे पाच वाजता मंगलचरणाने सुरवात करत, भूपाळ्या, भजनमालिका वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी, नाटाचे अभंग व समारोप विनवणीचे अभंग आणि आरती, पसायदानाने टाळ, मृदुंग गजर व विणे च्या मंगलमय सुरात  या भक्तिमय सोहळ्याची सांगता होत असते.

 

काकडा आरती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रोज असंख्य महिला व पुरुष भाविकांची भल्या पहाटे  मंदिरात उपस्थिती असते. महिला भगिनींची उपस्थिती सुद्धा काकड आरती प्रभात फेरीचे, तसेच काकड आरती प्रभात फेरी मार्गावर सडा समार्जन, रांगोळ्या,  निरंजन लावून आणलेले पूजेचे  ताट या सोहळ्याची शोभा वाढवतांना दिसत आहे. रोज असणारे  प्रभात मार्गावर भाविकांना चहा व दूध पेयाचे  आयोजन केले जाते.

संपूर्ण सोहळ्याचे नियोजन  जय हनुमान मंदिर समिती प्रभाग क्र.१२ शिवरायनगरचे सेवा निवृत्त सह निबंधक कार्यालय कर्मचारी सुरेश भोलाणे, शांताराम लिहेकर, पाटबंधारे विभाग कर्मचारी दिलीप पाटील, ज्ञानेश्वर माळी, रमेश राजाराम माळी, सेवा निवृत्त वायरमन शिवाजी मराठे, मदन भोई, संतोष मिस्तरी, गोपाळ चौधरी, सेवा निवृत्त पोलिस कर्मचारी नामदेव माळी, सेवा निवृत्त कंडक्टर रतन बदगुजर, किर्तनकार ह भ प सौ दूर्गाताई संतोष मराठे, ह भ प रतिराम महाराज नागरुत, खामखेडा, मृदुंग वादक विशाल कोळी , नगरसेवक संतोष मराठे , प्रशांत बाविस्कर, राजू जोगी, बाळू श्रीखंडे, गोपाळ काठोके  यांच्यासह सविताबाई लिहेकर, लताबाई माळी, नलिनीबाई  माळी, विमलबाई सनांसे , विमलबाई सोनार , विमलबाई माळी, संगीताबाई श्रीखंडे, उषाताई सुनील पाटील,  कुसुमबाई बाविस्कर यांच्यासह असंख्य भाविकांची उपस्थिती असते.

अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेला काकडा आरती सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होतो. संपूर्ण शिवरायनगर प्रभाग क्र.१२ मध्ये भक्तीमय वातावरणात हनुमान मंदिर व कुंभार वाड्यातील महादेव मंदिरांमध्ये काकड आरती सुरू झाल्याने सगळीकडेच अत्यंत प्रसन्न आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

भल्या पहाटे ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून परंपरा जोपासत आहे. महिला भगिनी आरतीचे ताट घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. रोज सकाळी काकड आरती, अभंग, भूपाळया, आंधळे- पांगूळ, वासुदेव, रूपकाचे अभंग, गौळणी महाआरतीद्वारे पूजा केली जाते व तीर्थप्रसाद दिला जातो.

काकड आरती वेळेस श्रीकृष्ण मूर्तीना सुंदर हार घालून, प्रांगणात आकर्षक रांगोळी व  अतिशय सुंदर सजावट केली जाते. त्यामुळे एकूणच मंदिर व परिसरात भक्तीमय वातावरण व प्रसन्नता निर्माण होत असते.

 

Protected Content