ईद घरीच साजरी करा आणि कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे यासाठी दुआ मागा : मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे निर्माण परिस्थिती अनपेक्षित आणि कोणाच्याही ध्यानी मनी नसलेली आहे. त्यामुळे ईद रस्त्यावर न येता, कोठेही गर्दी न करता घरीच साजरी करा. हे संकट लवकर दूर व्हावे यासाठी दुआ मागा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी आज पुन्हा एकदा संवाद साधला.

 

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, सर्दी खोकला ताप याशिवाय थकवा, तोंडाची चव जाणे, वास न येणे कोरोनाची अशी नवे लक्षणेही समोर आली आहेत. ती अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांना दाखवा. पावसाळा सुरु झाल्यानंतर विनाकारण भिजणे शक्यतो टाळा. पाणी उकळून प्या, रोगराई आणि साथी आपल्याला टाळायच्या आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच पुढील आठ ते दहा दिवस पुरेसा रक्तसाठा, इच्छुक रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विरोधकांच्या पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीचाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाचार घेतला. पॅकेज का नाही दिले असा प्रश्न विचारतात. पण लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय? आरोग्य सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे, अन्न धान्य आणि उपचार हे पॅकेजपेक्षा महत्वाचे आहे. मराठवाडा, विदर्भ याच्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा ग्रामीण भागातील जनतेनेही चांगले सहकार्य केले आणि कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवला. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. आता गुणाकार जीवघेणा होणार, केसेस वाढणार आहेत. यासाठी अनेक मैदान, सभागृह आम्ही सज्ज ठेवली आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स, गोरेगाव येथे फिल्ड हॉस्पिटल सुरु केली आहेत. आपल्याकडे जवळपास 7 हजार बेड्स उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Protected Content