यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील इलेक्ट्रिकचे गोडाऊन फोडून इलेक्ट्रिक सामानांची चोरी केल्याचे घटना उघडकीला आली आहे. चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण सुधाकर भंगाळे (वय-४०) रा.सांगवी बुद्रुक ता.यावल यांचे यावल शहरात आशीर्वाद इलेक्ट्रिक नावाचे दुकान आहे. तसेच फैजपूर रोडवर इलेक्ट्रीक सामान ठेवण्यासाठी गोडाऊन आहे. दुकानाचा व्यवसाय किरण भंगाळे व त्यांचे मोठे भाऊ शैलेश भंगाळे हे पाहतात. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सुमारास किरण भंगाळे हे नेहमीप्रमाणे दुकानावर ९ वाजता गेले तर त्यांचे भाऊ शैलेश भंगाळे हे गोडाऊनवर ९.३० वाजता गेले असता त्यांना गोडाऊनचे कडीकोयंडा तोडलेले दिसून आले. आत जाऊन पाहिले असता काही सामानांची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून त्यांनी तातडीने यावल पोलिसांना कळविले. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यामध्ये ३ हजार रुपये किमतीचे टिपलींग कंपनीचे राऊटर, ३ हजार रुपये किमतीची इन्वर्टर आणि ५०० रुपये किमतीचे सेटटॉप बॉक्स असा ऐकून ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून आल्याचे समोर आले आहे. शिवाय रिवाइंडिंग करण्याचे जुने बेरिंग, बुशिंग व कॉपर वायर हे देखील आढळून आले नाही. यासंदर्भात किरण भंगाळे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जणांनी आत प्रवेश करत चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.