भुसावळ प्रतिनिधी । २०२१ पर्यंत इगतपुरी ते बडनेरा या रेल्वे मार्गावर १३० किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वे गाडी चालविण्याचा भुसावळ मंडळाचा प्रयत्न असणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार असल्याची माहिती मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी दिली.
मध्य रेल्वे आणि भुसावळ मंडळ यांच्या वतीने आयोजित आभासी पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी कोरोनाची साथ नियंत्रित झाल्यावर राज्य आणि केंद्राच्या निर्देशानुसार नियमितपणे रेल्वे प्रवासी गाडय़ा धावू शकतील, अशी आशा व्यक्त केली. यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी असून वरिष्ठ पातळी वरून आदेश प्राप्त होताच आम्ही गाडय़ांचे संचालन सुरू करू. भुसावळ ते जळगाव तिसऱ्या मार्गाचे काम डिसेंबपर्यंत पूर्ण होईल. चौथी रेल्वे मार्गिका लवकरात लवकर पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न असेल. जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम प्रगतीपथावर आहे. भुसावळ विभागांतर्गत असलेल्या खंडवा ते मथेला या रेल्वे मार्ग दरम्यान काही तांत्रिक कामे अजून बाकी आहेत.
ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील भाविकांना थेट रेल्वे सुविधा डिसेंबर २०२१ पासून सुरू होऊ शकते, असे गुप्ता यांनी सांगितले.भुसावळ शहरातील आराधना कॉलनीजवळ बोगदा तयार असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने लवकरच तो वापरासाठी खुला करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
भुसावळ विभागात कंटेनरची वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि कंटेनर धारकांना माल भरणे, उतरविणे करणे सुलभ व्हावे यासाठी खेरवाडी, नांदगाव आणि भुसावळ या ठिकाणी कंटेनर रेल टर्मिनल उभारणीचे कार्य अंतिम टप्प्यात असून सप्टेंबरअखेर येथून कार्य सुरू होऊ शकते.
किसान पार्सल रेल्वेला प्रतिसाद मिळत असल्याने ही गाडी २५ ऑगस्टपासून आठवडय़ातून एक दिवस ऐवजी दोन दिवस (मंगळवार आणि शुक्रवार) सोडण्यात येत आहे. आतापर्यंत या गाडीच्या माध्यमातून एकूण ३४१ टन शेतीमालाची वाहतूक करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मुख्यालय असलेल्या रूग्णालयात ६४ खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून आतापर्यंत ४५७ रुग्णांचे उपचार याठिकाणी करण्यात आले. भुसावळ येथे २० डब्यांची विलगीकरण कक्षयुक्त रेल्वे गाडी सुसज्ज ठेवण्यात आली आहे. भुसावळ-देवळाली दरम्यान धावणारी पॅसेंजर लवकरच बंद करून त्याऐवजी मेमु लोकल सुरू करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास या गाडीचा इगतपुरीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
टाळेबंदीत भुसावळ विभागाने एप्रिल ते २३ ऑगस्टपर्यंत कोळसा, लोखंड, सिमेंट, स्टील, पेट्रोल, डिझेल आदी विविध प्रकारच्या माल वाहतुकीतून २०० कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागील वर्षी याच कालावधीत भुसावळ विभागाचे उत्पन्न १५० कोटीचे होते. याशिवाय इंधन बचतीतून साधारणत: ७० ते ८० कोटी रुपये बचत आतापर्यंत विभागाने केली आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.