मुंबई: वृत्तसंस्था । घाटकोपर येथील ४० वर्षीय इंटेरिअर डिझायनर महिलेवर पोलीस कॉन्स्टेबलने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी पोलिसावर गुन्हा नोंदवला आहे. २२ वर्षांत ८७ लाख रुपये उकळल्याचाही आरोप तिने केला आहे
लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. वर्षभरापूर्वी पीडित महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र, माझं लग्न आधीच झालेलं आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. जर लग्न केले तर मला नोकरी गमवावी लागेल, असे कॉन्स्टेबलने तिला सांगितले. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तुझ्याशी लग्न करीन असे त्याने सांगितले. मात्र, त्याने तसे केले नाही, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
१९९८ मध्ये कॉन्स्टेबलसोबत ओळख झाली होती. अंधेरीतील खासगी कंपनीत त्यावेळी ती नोकरी करत होती. काही दिवसांनंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यावेळी त्याने लग्नाच्या भूलथापा दिल्या. आरोपीने माझ्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. जवळपास ८७ लाख रुपये माझ्याकडून उकळले, असाही आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.