ओएनजीसीच्या जहाजावरील १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह समुद्रातून काढले

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळाचा ‘बॉम्बे हाय’ क्षेत्रात तेल उत्खनन करणाऱ्या तराफ्यांना तडाखा बसला. पी-३०५ हा तराफ्याचा नांगर वाहवत गेला आणि तराफा भरकटला. नौदलाला अरबी समुद्रात १४ कर्मचाऱ्यांचे मृतदेह मिळाले असून, हे मृतदेह मुंबई डॉकयार्ड येथे आणण्यात येत आहेत.

 

तराफ्यावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर चक्रीवादळ आणि मुसळधार पावसातच नौदलाने युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेतली. बुधवारी सकाळपर्यंत १८४ जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं. आता १४ जण मरण पावले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

सोमवारी मुंबईजवळ अरबी समुद्रात तौते चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनाही बसला. पण, सर्वाधिक फटका बसला, तो ‘बॉम्बे हाय’ या तेल उत्खनन होत असलेल्या क्षेत्राला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून ओएनजीसीच्या सेवेत असलेल्या ‘पी ३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर बुडाला. तराफा बुडून कर्मचारी बेपत्ता झाले होते. त्यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आलं असून, आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह नौदलाला मिळाले आहेत.

 

शोध मोहिमेचे कमांडर आणि नौदलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख एमके झा यांनी १४ मृतदेह सापडल्यांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृतदेह सापडलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पी-३०५ वरील बेपत्ता असलेल्यांचा मृत्यू झाल्याचं अद्याप कळू शकलेलं नाही, असंही ते म्हणाले. पी ३०५ तराफ्यावरील ८९ कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत.

 

भरकटलेला तराफा बुडत असल्याचं अंदाज आल्यानं जीवरक्षक जॅकेट घालून कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उड्या घेतल्या. या तराफ्यावरून सोमवारी सकाळी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला होता. नौदलाच्या युद्धनौका मदतीसाठी पोहोचेपर्यंत अनेक तास कर्मचारी खवळलेल्या समुद्रात या जॅकेटच्या आधारे तरंगत तग धरून होते.

 

Protected Content