आ. गोपीचंद पडळकरांसह समर्थकांवर गुन्हा दाखल

 

 

जेजुरी : वृत्तसंस्था । येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होण्याआधीच आज आ. गोपीचंद पडळकर यांनी  लोकार्पण करण्याचा प्रयत्न केल्या नंतर त्यांच्या सह समर्थकांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्या जेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. या आधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज भल्या पहाटे जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने त्यांना मज्जाव केल्याने येथे काही काळ तणावाचे वातावरण पसरले. पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून पुतळ्याच्या खालील भागातच ठिय्या मांडला.

 

या पुतळ्याचे आपण अनावरण केले असल्याची घोषणा आ. पडळकर यांनी केली . आ. पडळकर यांनी जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन करत अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्यासह इतरांच्या विरूध्द पोलीस स्थानकात जमावबंदीचे उल्लंघन, पोलिसांच्या कामात अडथळा व  अन्य कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content