आसोदा येथे पतीने पत्नीला पेटविले; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथे एका महिलेस तिच्या पतीने पेटवून दिले असून यात ती ५० टक्के भाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह दोन नणंदांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्ध वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बँकेतील पैसे आपल्यालाच मिळावे या भावनेतून पती व नंदांनी विवाहितेचा छळ केला. ऐवढेच नव्हे तर पतीने थेट पत्नीच्या अंगावर ऑईल ओतून पेटवून दिले. यात ती ५० टक्के भाजली गेली आहे. काल बुधवारी रात्री १० वाजता आसोदा गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात पतीसह दोन नंदा यांच्या विरोधात विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे
कांचन संतोष नन्नवरे (वय ३०, रा.भोळेनगर, आसोदा) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. पीडितेचा पती संतोष प्रकाश नन्नवरे, सासरे प्रकाश रामदास नन्नवरे, मुले सारंग, संग्राम व मुलगी विशाखा यांच्यासह आसोदा येथे राहतात. पती वाहनचालक आहेत तर सासरे वृद्ध व सतत आजारी असल्यामुळे घरीच असतात.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून कांचन यांच्या नणंद आशा शांताराम साळुंखे (रा. शिव कॉलनी) व सपना अमृत सोनवणे (रा.घाडी, ता.जळगाव) ह्या आसोदा येथे राहण्यासाठी आल्या होत्या. आठ दिवसांपासून दोघी जणी किरकोळ कारणांवरुन कांचन यांच्याशी भांडण करीत होत्या. दरम्यान, वडील प्रकाश नन्नवरे यांची प्रकृती खराब असल्याचे सांगत १ जूलै रोजी संतोष याने लहान भाऊ दिनेश व त्याची पत्नी माधुरी यांनाही मुलाबाळांसह आसोद्यात बोलावुन घेतले होते. १ जूलै रोजी सायंकाळी पाच वाजता पुन्हा एकदा पती संतोष, नणंदा सपना व आशा या तीघांनी कांचनसोबत भांडण सुरू केले. तर पती संतोष याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद त्यावेळी मिटला होता. यानंतर रात्री १० वाजता कांचन ह्या घराच्या मागच्या बाजुस लघुशंकेसाठी गेल्या असता पती संतोष हा मागुन प्लास्टीकच्या कॅनमध्ये ऑईल घेऊन आला. त्याने कांचनच्या अंगावर ऑईल फेकुन काडीपेटीने पेटवुन दिले. यामुळे कांचनच्या साडीने पेट घेतला. तिने आरोळ्या मारताच घरात असलेला तीचा दीर दिनेश व देराणी माधुरी यांनी घराबाहेर धाव घेतली. दोघांनी कांचनच्या अंगावर चादरी टाकुन त्यांना विझवले. यानंतर तिला रुग्णवाहिकेतून जळगावात आणुन खासगी रुग्णालयात दाखल केलेे. या घटनेत कांचन ५० टक्के भाजल्या गेल्या आहेत.

या घटनेची माहिती गुरुवारी सकाळी रुग्णालयातून तालुका पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर पोलिसांचे पथक रुग्णालयात गेले. कांचन यांनी स्वत: दिलेल्या फिर्यादीवरुन पती संतोष, नणंदा आशा व सपना या तीघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण तपास करीत आहेत.

Protected Content