आता घरीच राहून कोरोनावर उपचार शक्य : जिल्हा प्रशासनाचे नवीन परिपत्रक

जळगाव प्रतिनिधी । कोणतेही लक्षणे नसणारे वा सौम्य लक्षणे असणार्‍या रूग्णांना आता घरीच उपचारासाठी परवानगी देण्यात आली असून या संदर्भातील परिपत्रक आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केले आहे. पहा या परिपत्रकात नेमके कोणते नियम आहेत ते ?

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोणतेही लक्षणे नसणारे वा सौम्य लक्षणे असणार्‍या रूग्णांना आता घरीच उपचारासाठी परवानगी देण्याचे जाहीर केले होते. शासनाच्या या निर्देशानुसार आता जिल्हा प्रशासनाने परिपत्रक जाहीर केले असून यात गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वॉरंटाईन या पध्दतीत उपचार घेण्यासाठीच्या नियमांची माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार आतापर्यंत लक्षणे नसणारे व कमी लक्षणे असणार्‍यांना कोविड केअर सेंटर; मध्यम लक्षणे असणार्‍यांना डेडीकेटेड कोविड
केअर सेंटर आणि तीव्र लक्षणे असणार्‍यांना डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये भरती करण्याचा नियम होता. जिल्हा प्रशासनाच्या ताज्या नियमानुसार आता लक्षणे नसणारे वा सौम्य लक्षणे असणार्‍यांना होम क्वॉरंटाईन राहून उपचार घेता येणार आहेत. यासाठी खालील नियम असतील.

१) गृह विलगीकरणाची परवानगी मागणार्‍या व्यक्तीचे सिंगल फॅमिली या प्रकारातील कुटुंब असून त्याच्या घरात स्वतंत्र शौचालय आणि दोन बेडरूमसह किमान चार खोल्या असणे गरजेचे आहे. याची खातरजमा ही संबंधीत विभागाचा तलाठी वा ग्रामसेवकातर्फे केल्यानंतरच परवानगी मिणार आहे.

२) होम क्वॉरंटाईनसाठी दोन्ही बाजूला राहणारे रहिवासी व अपार्टमेंट असल्यास संबंधीत मजल्यावरील शेजार्‍यांचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

३) संबंधीत रूग्णाला कोणतेही लक्षणे नाहीत अथवा त्याला अतिशय सौम्य लक्षणे असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकार्‍याने प्रमाणित केले असावे.

४) संबंधीत रूग्णाच्या घरी उपचारासाठी आवश्यक असणार्‍या सुविधा असाव्यात.

५) संबंधीत रूग्णाच्या घरी संपर्काची व्यवस्था असून ते नजीकच्या रूग्णालयाच्या संपर्कात राहण्याची सुविधा असावी.

६) वैद्यकीय अधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली संबंधीत रूग्ण आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी आवश्यक त्या प्रमाणात हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनचा डोस घेणे अनिवार्य राहणार आहे.

७) संबंधीत रूग्णाने आपल्या स्मार्टफोनवर आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

८) रूग्णाने स्वत:सह कुटुंबाची काळजी घेऊन वेळोवेळी सर्वेक्षण अधिकारी व पथकाला माहिती देणे गरजेचे आहे.

९) यानुसार अटींची पूर्तता करणार्‍यांना जळगाव शहरात महापालिका आयुक्त तसेच इन्सीडेंट ऑफीसर तर तालुका पातळीवर तहसीलदार होम क्वॉरंटाईन या प्रकारात उपचाराची सुविधा देणार असल्याचे या पत्रकात नमूद केले आहे.

Protected Content