गुवाहाटी (वृत्तसंस्था) आसाममध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १११ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील २४ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून २४ लाखहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या रिपोर्टनुसार अनेक लोक पूरग्रस्त भागात अडकले असून त्यांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम सुरु आहे. ब्रह्मपुत्रा नदीने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफच्या टीमकडून सतत रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. काझीरंगा नॅशनल पार्कचा ८५ टक्के भागात पूर परिस्थिती आहे. त्यामुळे येथील आतापर्यंत ११३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर १४० प्राण्यांना वाचवण्यात यश आले आहे. येथील संरक्षित वन्य प्रजाती अस्तित्वावर मोठं संकट उभं राहिलं असून पुरामुळे केवळ मानवी जीवनच नाही तर प्राण्यांनादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.