आयपीएल सामने मुंबईबाहेर नेण्याच्या हालचाली

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  बीसीसीआयने  अद्याप  कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही, परंतु कोरोना आणि सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील सामने शिफ्ट केले जाऊ शकतील, अशा चर्चा सध्या सुरु आहे

 

देशात त्यातही प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगातली सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आयपीएलची तयारी करत असलेल्या तीन खेळाडूंना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक संघ आणि बीसीसीआय सध्या चिंतेत आहेत.

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा   फलंदाज देवदत्त पडिक्कल   याला कोरोनाची लागण झाली आहे. काल  दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपला पहिला सामना 10 एप्रिल रोजी मुंबईत खेळणार आहे. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाचा कोरोनो रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. परंतु त्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या संघात सहभागी झाला आहे. दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यामुळे बीसीसीआयचे अधिकारी चिंतेत आहेत.

 

सध्या आयपीएलमधील पाच संघ मुंबईत असून मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघातील खेळाडू मुंबईत आहेत.

 

अधिकाऱ्यांनी  सांगितले आहे की, येत्या 48 तासांचे निरीक्षण करूनच निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत सर्व खेळाडूंना कडक प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले गेले आहे आणि कोणत्याही प्रकारे बायो बबलमधून बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. बीसीसीआयकडे काही मार्ग आहेत ज्याद्वारे बीसीसीआय प्रयत्न करू शकते. त्याची चाचपणी सुरु केली असल्याचे बोलले जात आहे.

 

मुंबईतील परिस्थिती खराब असेल तर सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील सामने इतर कुठल्याही ठिकाणी हलवता येतील. लीग फेरीत मुंबईत 10 सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयने हैदराबादचा पर्याय बॅकअप म्हणून ठेवला आहे. गरज पडल्यास मुंबईतील सर्व सामने हैदराबादला शिफ्ट केले जाऊ शकतात.

बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी रोज करु शकते. सध्या दर तीन दिवसांनी कोरोना चाचणी घेतली जाते, परंतु सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी बीसीसीआय दररोज चाचण्या घेऊ शकते.

 

बीसीसीआयचं कार्यकारी पथक आधीच बायो बबलचा एक भाग आहे. आता ग्राऊंड स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल तयार केलं जाईल.

कोणत्याही टीमला पहिल्या एका महिन्यात प्रवास करावा लागणार नाही. तथापि, यानंतर, प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी बीसीसीआयला घ्यावी लागेल. विमानतळावरही विशेष लक्ष द्यावे लागेल.

Protected Content