जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव – गेल्या २० फेब्रुवारी २०२३ पासून राज्यभरासह जळगाव जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे गटसचिव यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाबाबत अखेर तोडगा निघाला असून ना.गिरीषभाऊ महाजन व ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेश चव्हाण यांच्या यशस्वी शिष्टाईने जळगाव जिल्ह्यातील गटसचिवानी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात झालेल्या बैठकीत गट सचिवांच्या संदर्भातील अनेक वर्षांपासून वेतन व सेवा तसेच दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली व सकारात्मक निर्णय घेण्यात आले. जिल्हा बँकेत सत्ता बदल झाल्यानंतर नवीन चेअरमन संजय पवार व सत्ताधारी यांच्यासमोर गटसचिवांच्या कामबंद आंदोलनाचा विषय मार्गी लावण्याचे मोठे आव्हान होते, कारण विकास सोसायट्यांमध्ये ३१ मार्च च्या आत कर्ज भरणा झाल्यास शेतकऱ्यांना १०० टक्के व्याजमाफी मिळते. मात्र गट सचिवांच्या कामबंद आंदोलनामुळे ३१ मार्च च्या आत भरणा होईल की नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, तसेच हजारो कर्जदार शेतकरी विकास सोसायटीचे खाते बंद करून राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळण्याची भीती देखील होती, मात्र नूतन सत्ताधाऱ्यांनी हे आव्हान लीलया पेलत आंदोलन मागे घेण्यात यश मिळाल्याने केवळ गटसचिवच नव्हे तर जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बीडवई, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, गटसचिव संघटना जिल्हा अध्यक्ष ईश्वर चव्हाण हिंगोणेकर, कृती समिती सदस्य राहुल बोरसे, गुलाब बाबा, दिलीप चव्हाण, राजू काळे, सुदाम पाटील, धनंजय मांडोळे, निंबा चव्हाण यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचे गटसचिव संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मागण्यांबाबत झाले निर्णय…
१) जळगाव जिल्ह्यातील गटसचिवांचे गेल्या अनेक महिन्यापासून सुमारे पाच कोटी रुपये वेतन थकित आहेत. ते थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये २.५ ( अडीच कोटी) हे संस्था सक्षमीकरणसाठी आलेल्या शासनाच्या अनुदानातून अदा करण्यात येतील तसेच उर्वरित पगाराची रक्कम ही संबंधित संस्थांनी प्रकरण तयार करून जिल्हा उपनिबंधक कार्यालय जळगाव यांच्याकडे जमा करावी. सदर संस्थांनी तयार केलेले फिक्स लोन प्रकरण बँकेने मंजूर करावे त्यातून जिल्ह्यातील गट सचिवांचे थकीत असलेले वेतन पूर्णपणे करण्याच्या सूचना संबंधित बँक प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच संस्थांना प्रकरण तयार करताना नियमाच्या ज्या जाचक अटी जिल्हा बँकेने परिपत्रकाप्रमाणे घालून दिलेल्या आहेत त्या अटी रद्द करून कमीत कमी अटीस पात्र राहून जिल्हा बँकेने संबंधित संस्थांचे प्रकरण मंजूर करावे अशाही सूचना देण्यात आल्या.
२) तसेच आंदोलनामुळे गटसचिवांना बँकेच्या कर्जवाटप धोरणाप्रमाणे कमाल मर्यादा पत्रक देणे आवश्यक असते मात्र गेल्या महिनाभर सुरु असलेल्या कामबंद आंदोलनामुळे सदर कमपत्रक देण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला.
३) रु.२५ लक्ष तफावत असणाऱ्या विकास संस्थाच्या बाबतीत देखील लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासान यावेळी देण्यात आले.
आमदार मंगेश चव्हाण यांची शिष्टाई यशस्वी, जिल्हाभरातील गटसचिवानी मानले दोन्ही मंत्री, चेअरमन व आमदारांचे आभार…
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा दुध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांच्याकडे गटसचिव संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. जिल्हा बँकेत झालेल्या सत्ताबदलानंतर एकाच आठवड्यात तुमच्या मागण्यांबाबत बैठक घेऊ असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले होते. त्यानंतर ना.गिरीषभाऊ महाजन, ना.गुलाबरावजी पाटील व चेअरमन संजय पवार यांच्याशी चर्चा करून आमदार चव्हाण यांनी सदर बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला व आपला शब्द पाळला. गटसचिवांच्या आंदोलनावर यशस्वी शिष्टाई करत सकारात्मक तोडगा काढून दिल्याबद्दल जिल्हाभरातील गटसचिवानी जिल्ह्याचे ग्रामविकासमंत्री गिरीषभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार व आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
गटसचिव हा विकास सोसायटीचा आत्मा असून गटचिवाला कदापिही वाऱ्यावर सोडले जाणार नाही – आमदार मंगेश चव्हाण
भाजपा शिवसेनेचे सरकार तसेच ग्रामीण विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजू भाऊ पवार यांच्यापाठीमागे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बँकेचा आर्थिक कणा संबोधल्या जाणाऱ्या विकास सोसायट्यांचा आत्मा म्हणून गट सचिवांकडे पाहिले जाते. त्यांना कदापि वाऱ्यावर सोडले जाणार नाही असे आश्वासन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. शेतकरी सभासद संस्था आणि जिल्हा बँकेचे हित लक्षात घेऊन सर्व गट सचिव बांधवांनी आपला चालू असलेला संप थांबवून संस्थांची आणि बँकेची कर्ज वसुली जास्त कशी होईल या गोष्टीकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देऊन आपल्याला नेमून दिलेल्या सेवास्थळी हजर होऊन पूर्ववत कामकाज सुरू करावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.