मुंबई : वृत्तसंस्था । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची ७८ एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची १०० कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या हे आज टिटवाळ्यातील गुरवली गावात आले होते. यावेळी त्यांनी विहंग आस्था हौसिंग कंपनीच्या जागांची पाहणी केली. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे १०० कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे ११२ जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील ७८ एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. घोटाळ्यातील १०० कोटीची रक्कम परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
“पीएमएलए कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे.या जमिनींवर अतिक्रमण करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये”, असं या बोर्डावर ईडीने लिहिलं असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणाऱ्या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे, असं ते म्हणाले.
टिटवाळा येथील गुरवली येथे येण्यासाठी मुंबईहून निघालेले भाजप नेते किरीट सोमय्या यांना टिटवाळा रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यांची गाडी वाहतूक कोंडीत फसली. अखेर स्वत: सोमय्या गाडीतून उतरले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली. ठाकरे सरकार रस्ता रुंदीकरणाचे नाटक करीत आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्याच्या प्रगतीची गती ही थांबली आहे. महापालिका निवडणूका जवळ आलेल्या आहेत. आगामी महापालिका निवडणूकीत जनता ठाकरे सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले