जळगाव प्रतिनिधी । आमदार चंदूलाल पटेल यांनी निवड केलेल्या आदर्श ग्राम योजनेत वाघनगरात कामे प्रस्तावित केली असली तरी ती झालीच नसल्याचे जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून उघड केले आहे.
आमदार पटेल यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेत वाघनगरची निवड केली होती. त्यासाठी २० मार्च २०१७ला जिल्हाधिकार्यांना पत्र दिले होते. या योजनेत प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधणे (६ लाख), दलित वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर बांधकाम करणे (६ लाख), सावखेडा येथे २ किमी रस्ता खडीकरण करणे (१६ लाख), आरोग्य उपकेंद्र बांधकाम (१० लाख), सावखेडा येथे नदीत बंधारा टाकणे व गावाची जीर्ण पाइपलाइन बदलून नवीन टाकणे (३८.५ लाख), वाघनगरच्या नवीन वस्तीत रस्ते तयार करणे (५० लाख), काँक्रीट गटार ढापे (२५ लाख), शेत रस्ते (१० लाख), समाज मंदिर बहुउद्देशीय सभागृह बांधणे (८ लाख) पॉली हाऊस (९ लाख), गोदाम (१२.५० लाख), शाळा १ नवीन इमारत (७ लाख) आदी २९ कामांचा समावेश होता.
मात्र याबाबत कोणतीही हालचाल न झाल्यामुळे जागृत जनमंचच्या सदस्यांनी दरवर्षी पटेल यांची भेट घेऊन आमदार आदर्श ग्रामदत्तक योजनेबाबत पाठपुरावा केला होता.मात्र आमदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. यामुळे जनमंचतर्फे जिल्हा नियोजन समितीकडे माहिती अधिकारात अर्ज टाकून या योजनेत कोणती कामे झाली, याची माहिती मागितली. त्यावरील उत्तरात आमदार पटेल यांच्या २० मार्च २०१७च्या पत्रानुसार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कोणतीही कामे घेण्यात आलेली नसल्याचे दिसून आले आहे.
या संदर्भात आमदार पटेल म्हणाले की, आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निधीची स्वतंत्र तरतूद नाही. जिल्ह्याला मिळालेल्या निधीतून ही कामे करण्यासाठी समावेश केलेला नाही. त्याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विषय मांडला होता. आमदार निधी केवळ २ कोटी मिळतो. त्यातून जिल्हाभरात द्यायचे असतात. त्याने मर्यादा येतात. त्यामुळे वाघनगरातील प्रस्तावित कामांपैकी एकही काम झालेले नाही.