आमच्या नेत्याच्या केसालाही धक्का लावाल तर हात कलम करू – आ. चव्हाण

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या केसालाही धक्का लावला तर हात कलम केले जातील असे सुतोवाच आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. ते सरकारविरोधी जाहीर निषेध नोंदवित असताना बोलत होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंगप्रकरणी चौकशीकामी पोलीस ठाणे व सायबर विभागांकडून समन्स बजावण्यात आले आहे. याचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी चाळीसगावात भारतीय जनता पक्षांकडून सदर नोटीसीचे दहन करून महाविकास आघाडी सरकारचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या केसालाही धक्का लावला तर हात कलम केले जातील असे सुतोवाच केले. तसेच महाविकास आघाडी सरकार पोलिस बळाचा वापर करून भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांना अडकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देण्यात आली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम, यु. डी. माळी, सरचिटणीस गिरीश बऱ्हाटे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content