मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मी कुणा आमदारांच्या सह्या घेतल्या नाहीत. तथापि, काही विघ्नसंतोषी लोक बातम्या पेरत आहेत. त्यांनी आमचे वकिलपत्र घेऊ नये ! अशा शब्दांमध्ये अजितदादा पवार यांनी संजय राऊत यांना आज फटकारले.
अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यात त्यांनी प्रामुख्याने माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांबाबत नाराजी व्यक्त करत नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टिका केली. ते म्हणाले की, ”आमच्याबद्दल काही विघ्नसंतोषी लोक बातम्या पेरण्याचं काम करत आहे. पक्षाबाहेरचे काही प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहे, त्यांना कुणी अधिकार दिला आहे, कुणाच ठाऊक. तुमच्या पक्षाचं काय बोलायचं आहे ते बोलाना, तुम्ही ज्या पक्षाचे मुखपत्र आहे, त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून ते असं झालं, तसं झालं, आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी ठाम आहोत. आमचं वकिलपत्र घेण्याचं कुणी कारण नाही. त्यांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडावी” असं म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारलं.
अजितदादा पुढे म्हणाले की, मी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादीतच आहोत, सगळे आमदार हे राष्ट्रवादीतच राहणार आहे. ज्या वृतवाहिन्या आणि राजकीय नेते जे काही बोलत आहे, ते त्यांचं मत आहे. ‘मी विधान परिषदेत बसत असतो, आज सगळे आमदार मला भेटायला आले आहे. यात वेगळा अर्थ काढू नका. जे आमदार हे मतदारसंघातील काम घेऊन आले आहे. त्याच्यामुळे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तो सुद्धा संभ्रम अवस्थेत गेला आहे. काहीही काळजी करू नका, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पक्ष स्थापन झाला आहे. ज्या बातम्या पसरवल्या जात आहे, त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहे. राज्यातील महत्त्वांच्या विषयाचे प्रश्न दुसरीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे’, असे अजित पवार म्हणाले.