आपत्कालीन स्थितीत करोनाची लस घेऊ ; जमात-ए-इस्लामीचा यू-टर्न

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना प्रतिबंधक लसीतील घटकांवर आक्षेप घेणाऱ्या आणि लस घेण्यास नकार देणाऱ्या भारतातील मुस्लिम संघटनांनी आता आपल्या भूमिकेपासून युटर्न घेतला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत हराम घटकांपासून बनवलेली लसही माणसांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही घेऊ असं मत आता त्यांनी व्यक्त केलं आहे.

जमात-ए-इस्लामी (हिंद) शरिया परिषदेचे सचिव डॉ. रजी-उल-इस्लाम नदवी यांनी म्हटलं, “जर काही अस्विकारार्ह घटक वेगळ्याच परिस्थितीत आणि रुपात उपलब्ध असतील तर त्याला पवित्र मानलं जाऊ शकतं आणि ते वैधही ठरतं. याच आधारावर डुक्कराच्या मांसातील जिलेटिनचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या लसीला इस्लामी कायदेतज्ज्ञांनी मंजुरी दिली आहे. ज्या इस्लामी कायदेतज्ज्ञांना हा बदल स्विकारार्ह नाही त्यांनी देखील जोपर्यंत हलाल लस तयार होत नाही, तोपर्यंत आपत्कालिन परिस्थितीत अस्विकारार्ह पदार्थांपासून बनवलेली लस घेतली जाऊ शकते, असं म्हटलं आहे”

दरम्यान, डॉ. नदवी यांनी हे देखील म्हटलं की, “सध्या लसीमध्ये मिळालेल्या पदार्थांबाबत जी माहिती समोर आली आहे. त्याला मान्यता दिली जाऊ शकत नाही. लसीतील घटक माहिती झाल्यानंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल”

भारतासह इस्लामिक देशातील अनेक संघटनांनी लसींना हराम संबोधलं आहे. यामध्ये युएई आणि इंडोनेशियातील संघटनांचाही समावेश आहे. भरतात ऑल इंडिया सुन्नी जमियत-उल-उलेमा काउन्सिल आणि मुंबईतील रझा अकादमीने देखील लसीला हराम संबोधलं होतं. डुक्करांच्या चरबीपासून बनवलेल्या लसीचा वापर मुस्लिम लोकांनी करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेका, फायझर आणि मॉडर्ना या परदेशातील लस निर्मिती कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या लसींमध्ये डुक्कराशी संबंधीत कुठलाही घटक मिसळलेला नाही. मात्र, साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि प्रभावी ठेवण्यासाठी डुक्करापासून काढलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो

Protected Content