चोपडा , प्रतिनिधी । पूर्वीचे लोक चुकांमधून आनंद शोधायची आता मात्र आनंदांत चुका शोधतात.तेच आपले अस्वस्थतेचे कारण आहे. अज्ञानात सुख मानले जात असल्याचे प्रतिपादन डॉ. संजय कळमकर यांनी केले. ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या चोपडा शाखेच्या वतीने पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात आयोजित ‘प्रियजन स्मृती व्याख्यानमाले’चे दुसरे पुष्प गुंफताना “आनंदाच्या वाटा” या विषयावर बोलत होते.
डॉ. संजय कळमकर यांनी पुढे सांगितले की, कुटुंबामध्ये संस्कार नावाचा शब्द कितपत राहिला आहे हा संशोधनाचा विषय आहे. म्हणून आता आपण म्हणतो की आनंद संपला पण तो संपला नाही तर आपण संपवला आहे. आनंद आणि सुखाकडे आपण पाहतच नाही. आनंद आपल्या जवळच असतो आपण त्याला दूर शोधतो. आता मोबाईल, टी. व्ही., संगणक या भौतिक गरजा महत्वाच्या झाल्या आहेत. समाजमाध्यमामुळे जागतिक दुःखाची सवय मानवाला झाली आहे. जवळची दुःखे मात्र तसेच आहेत. आनंद कुठे आहे ते आम्हाला समजत नाही. तरुणांनी सिक्स पॅक बनविण्यापेक्षा आपल्या बापाचा उघड्या अंगाकडे पाहावे. या गोष्टीचे भान आजच्या तरुणाला राहिले नाही. कुटुंबात आता आनंद राहिला नाही. आनंद तुमच्याजवळ आहे पण तो आपण दूर मानतो. हृदयाचा संवाद हरवला आहे असे डॉ. कळमकर यांनी सांगितले. याप्रसंगी मंचावर माजी जि. प. सदस्या इंदिरा पाटील ,नगराध्यक्षा मनीषा चौधरी, डॉ. गायत्री पाटील, राजाराम पाटील, रमेश शिंदे, मसापचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, घनश्याम अग्रवाल, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, सकाळचे बातमीदार सुनील पाटील, पत्रकार राकेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राचार्या योगिता पाटील यांनी तर परिचय जयश्री चव्हाण यांनी केला. आभार कुसुम पाटील यांनी मानले. यशस्वितेसाठी संजय बारी, गौरव महाले, पंकज नागपुरे, आर. डी. पाटील, प्रसाद वैद्य, स्नेहल पोतदार, जयश्री पाटील, योगिता पाटील, पंकज शिंदे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.