अखेर.. प्रदिर्घ कालावधीनंतर मिळाले वडोदा वनक्षेत्रास वनाधिकारी

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील पूर्व भागात पट्टेदार वाघांचा अधिवास यासाठी देशभरात सुप्रसिद्ध आहे.  मुक्ताईनगर  तालुक्याच्या आई-मुक्ताई भवानी (वडोदा) वनक्षेत्रास तब्बल सुमारे नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वनपरीक्षेत्र अधिकारी मिळाल्याने स्थानिकांसह वन्यप्रेमीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

पट्टेदार वाघांचा अधिवास क्षेत्र असलेल्या या भागात आठ ते दहा वाघांचा मुक्त संचार असुन जैवविविधतेसह विविध वनसंपदेसह निरनिराळ्या प्राण्यांचे अस्तित्व या जंगलात आढळते. वडोदा वनसंपदेच्या उत्तरेस लागुन असलेली मध्य प्रदेश वनहद्द, पुर्वेस बुलढाणा जिल्हा तसेच दक्षिणेस पुर्णा नदी व पश्चिमेस तापी नदी परिसर आहे. या परिसरात पट्टेदार वाघांचा कायमस्वरुपी असलेल्या अधिवासामुळे सदर जंगलाला महत्व आहे. वनसंवर्धनासह वन्यजीव संवर्धन होणे काळाची गरज असतांना, अवैध वनचराई, वृक्षतोड, अतिक्रमण यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वनक्षेत्रातील परीपुर्ण पदभारासह सक्षम वनाधिकाऱ्याची गरज या वनक्षेत्रास आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये तत्कालीन वनक्षेत्रपाल यांची वन्यजीव विभाग पाल येथे बदली झाल्याने वडोदा वनविभागाचा अतिरीक्त प्रभारी पदभार मुक्ताईनगर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल ए. आर. बच्छाव यांचेकडे देण्यात आला होता. तसेच मध्यंतरी फिरते गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल थोरात यांनीही काही कालावधीसाठी पदभार सांभाळला होता. दरम्यान वडोदा वनक्षेत्रात गेल्या नऊ महिन्यापासून वनाधिकारी पद रिक्त असल्याने वन्यप्रेमींसह स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

याची दाखल घेत शासनस्तरावरून सूत्रे हलल्यानंतर २५ मे रोजी सचिन ठाकरे यांनी तब्बल सुमारे नऊ महिन्यांनंतर वडोदा वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून या विभागाची सुत्रे हाती घेतली आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील नवेगांव बांध वाघझिरा व्याघ्र प्रकल्पात वनपाल पदावर कार्यरत असलेले सचिन ठाकरे पदोन्नती होवुन वडोदा वनपरीक्षेत्र अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. व्याघ्र प्रकल्पातील एक चांगला आणि प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्याने वडोदा परिसरात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा वन्यप्रेमींतुन व्यक्त केली जात आहे.

गैरप्रकारांना आळा घालणार

अवैध वनचराई, अतिक्रमण यासारख्या वन अपराधांना आवर घालण्याचे आव्हान आहे. असे असले तरी आगामी काळात वडोदा वनक्षेत्रात कोणत्याही स्वरुपाचे अवैध प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच वनकर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सुचना करण्यात येतील. वन्यप्रेमी व स्थानिक सुज्ञ नागरिकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे.

सचिन ठाकरे, वनपरीक्षेत्र अधिकारी, (वडोदा-मुक्ताईनगर)

Protected Content