पाचोरा, प्रतिनिधी । खान्देशात गेल्या महिन्याभरात आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवर वेगवेगळ्या ठिकाणी समाजाला लाजवेल व समाजात भितीचे वातावरण निर्माण होईल अशा भयावह घटना घडल्यामुळे आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलींवर अमानुषपणे अत्याचार करुन त्यांचा खुन करणाऱ्या आरोपींना फासावर लटकवा या मागणीसाठी आज रोजी पाचोरा येथे एकलव्य संघटनेतर्फे पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले.
मौजे सारंगखेडा ता. शहादा जि. नंदुरबार येथील अल्पवयीन मुलीला निर्दयीपणे जीवे ठार मारणाऱ्या आरोपीस व बोरखेडा ता. रावेर जि. जळगांव येथील एकाच कुटुंबातील मोठ्या मुलीवर बलात्कार करून चारही लहान बहिण भावांचा अत्यंत क्रुरभावनेने खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. याकामी दोन्ही घटनांचे दावे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन त्वरीत पिडितांना न्याय मिळवुन द्यावा तसेच त्यांचे परिजनांना शासनातर्फे आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी एकलव्य संघटना, पाचोरा यांनी आज रोजी पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ, उपाध्यक्ष रोहिदास जाधव, भडगाव तालुका अध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रविंद्र सोनवणे, युवा विद्यार्थी तालुका अध्यक्ष कैलास सोनवणे, तालुका संघटक राजेंद्र सोनवणे, युवा तालुका अध्यक्ष गणेश भिल, तालुका सल्लागार संतोष महाले सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरोपींविरुद्ध घोषणाबाजी ही करण्यात आली.