आदित्य ठाकरेंच्या कामांचे होणार ऑडिट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारचे निर्णय व योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावलेला असतांनाच माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील ऑडिट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे यांनी सांभाळलेले पर्यावरण मंत्रालय असल्याचे आता दिसून आले आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या कारभाराबाबत मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखाना सूचना देण्यात आल्या आहेत.

या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील ऑडिट करून केंद्र सरकार त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजवर केंद्र सरकारने ठाकरे पिता-पुत्राबाबत असा पवित्रा घेतला नसतांना आता ऑडिट करण्याचा निर्णय विशेष मानला जात आहे.

Protected Content