हैदराबाद वृत्तसंस्था । अवघ्या २० मिनिटांमध्ये कोरोनाच्या बाधेचे निदान करणारी चाचणी हैदराबाद येथील आयआयटीने विकसित केली असून यामुळे कोविड-१९ संसर्गाचा प्रतिकार करण्याला वेग येण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून या तुलनेत चाचण्यांचा वेग कमी असल्याने खूप अडचणी येत आहेत. या अनुषंगाने जलद गतीने कोरोनाच्या संसर्गाचे निदान करणारी चाचणी विकसित करण्याला वेग आलेला आहे. या अनुषंगाने हैदराबाद येथील आयआयटीने नवीन जलदगती चाचणीची प्रणाली तयार केली आहे. आयआयटी हैदराबादच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक शिव गोविंद सिंग यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. यानुसार या चाचणीमध्ये सध्या वापरण्यात येणार्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शन (आरटी-पीसीआर) याचा वापर करण्यात आलेला नाही. या किटची क्लिनीकल ट्रायल यशस्वी झाली असल्याने हे प्रॉडक्ट लवकरच बाजारपेठेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयआयटी हैदराबादच्या या किटचे वैशिष्ट्य म्हणजे हे आकाराने आटोपशीर असून कुठेही अगदी सहजपणे याच्या मदतीने चाचणी घेता येते. यातून फक्त २० मिनिटांमध्ये चाचणीचा रिझल्ट येतो. सर्वात महत्वाचे म्हणजे एका चाचणीसाठी ५५० रूपये खर्च येत असून उत्पादन वाढल्यास अवघ्या ३५० रूपयात ही चाचणी शक्य असल्याची माहिती शिव गोविंद सिंग यांनी दिली आहे. कोरोनाच्या चाचणीचे रिझल्ट लवकर मिळत नसल्याने देशभरात बहुतांश ठिकाणी प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या असतांना आयआयटी हैदराबादने विकसित केलेले हे किट वरदान ठरण्याची शक्यता आहे.