पी. आर. विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ- डॉ. संजीवकुमार सोनवणे

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील पी.आर. विद्यालयात कोणत्याही प्रकारचे डोनेशन घेतले जात नसून बहुजन हितासाठी अव्याहतपणे झटणार्‍या या शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेणारे डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी दिली आहे.

देदीप्यमान शैक्षणीक परंपरा असणार्‍या धरणगावातल्या पी. आर. विद्यालयाच्या मुख्यध्यापकपदाची सूत्रे लवकरच डॉ. संजीवकुमार सोनवणे हे स्वीकारणार आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आज त्यांनी समाजमाध्यमांमध्ये एका पोस्टच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्रातील शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या पी.आर. हायस्कूल या शाळेची यशाची मोठी परंपरा आहे. तुमचे आजी -आजोबा, आई- वडील,स्नेही- नातलग,मित्र, मंडळी याच शाळेतून शिकून आज विविध पदांवर काम करीत आहेत.उच्च विद्याविभुषित आपापल्या विषयात पारंगत असलेला उपक्रमशील शिक्षक वर्ग, अत्याधुनिक सुविधा असलेली प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय,अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान असलेली क्लास रूम आणि प्रशस्त क्रीडांगण या जमेच्या बाजू असलेल्या या शाळेच्या यशाची खात्रीशीर परंपरा ही लोकमान्य आहे.

कुठल्याही प्रकारची फी न घेणारी, बहुजन समाजातील मुलांच्या उत्कर्षासाठी झटणारी आणि फक्त आणि फक्त विद्यार्थी केंद्रीत असलेली ही शाळा यावर्षी अजून आपली कात टाकणार आहे. बोपर्डीकर सर ते प्रा. बी.एन.चौधरी सर या नामवंत मुख्याध्यापकांच्या परंपरेत यावर्षी श्री. एस. एम. अमृतकर सर नंतर माझ्या सारखा सामान्य घरातला विद्यावाचस्पती अर्थात एम.ए. एम.एड्.पीएच.डी. मिळवलेला आणि आपल्या लेखन आणि वक्तृत्वाने महाराष्ट्रातल्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा तुमच्या आमच्यातला मुख्याध्यापक या शाळेची धुरा चालवणार आहे.ही धरणगावच्या दृष्टीने खूप मोठी उपलब्धी असणार आहे. मी धरणगावच्याच मातीतला भूमिपुत्र असल्याने या मातीतल्या अस्सल हिरे माणिक मोत्यांची म्हणजेच तुमच्या मुलांमधल्या टॅलेंटची मला चांगली पारख आहे. तुमच्या पाल्यांचे भवितव्य घडविण्याची ही चांगली संधी आहे, माझा सर्व स्टाॅफ यासाठी कटिबद्ध राहणार असून तुमच्या हक्काच्या या शाळेत तुमच्या पाल्याचा प्रवेश घेऊन त्याला यशाचे मानकरी होऊ द्यावे, ही नम्र विनंती आहे. काहीही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला विचारू शकतात. ही शाळा तुमची आहे आणि तुमचे पाल्य हे आमचे पाल्य राहतील असा विश्वास देतो.पी.आर. हायस्कूल मध्ये बालवाडी पासून ते दहावीपर्यत (सेमी /मराठी) आपल्या पाल्याला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा.इयत्ता पाचवी ते दहावीची आम्ही कुठलीही अॅडमिन फी, डोनेशन आम्ही घेत नाही. आपल्या सोयीसाठी आपण सोशल डिस्टंन्शनचे पालन करुन सकाळी ९ ते १२ या दरम्यान शाळेत येऊन प्रवेश घेऊ शकतात किंवा आमच्या तुमच्या ओळखीच्या कोणत्याही शिक्षकाच्या मोबाईल वरही प्रवेश निश्चित करु शकतात.

या संदर्भात काही अडचण असल्यास ९४२३९३९३३५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content