धरणगाव येथील गौतम नगरमध्ये थर्मल स्कॅनिंगद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गावकुसाबाहेरच्या गौतम नगर परिसरात माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे आणि पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी दिलेल्या थर्मल स्कॅनिंग मशिनचे आणि पल्स आॅक्सीमिटरचे लोकार्पण आज गौतम नगर मध्ये माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे आणि साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. लगेच डाॅ. निपुण सोनवणे यांनी येथील रहिवाश्यांची स्कॅनिंग टेस्ट घेतली.

 

कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपण बघतोय स्वतःचे मुलंसुद्धा आपल्या कोरोनाग्रस्त आई बापाला, नातलगांना खांदा देऊ शकत नाही.इतकेच काय स्पर्श करायलाही तयार होत नाही. अशावेळी याच वस्तीतल्या काही उत्साही तरुणांनी त्याच सामाजिक बांधिलकी जपत मयत झालेल्या काही कोरोनाग्रस्तांचा अंत्यविधी केला आहे. येथील बरेच तरूण हे नगरपालिकेत रोजंदारीवर काम करतात. आपली सामाजिक सेवा म्हणून या तरूणांनी या महामारीच्या संकटकाळात धरणगावच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचेही व्रत स्वीकारले आहे. या काळात हे तरुण गल्लीबोळ स्वच्छ करणे, पूर्ण शहरात फवारणी करून परिसर निर्जंतुक करणे, कन्टेन्टमेंट झोन मधील परिसर सील करणे, संशयित रुग्णांचे घर आणि परिसर निर्जंतुक करणे, गल्लीबोळात साचलेला कचरा गोळा करून गावाबाहेर डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावणे, गटारी साफ करून त्या पावडर टाकून निर्जंतुक करणे ही जोखमीची कामे करत आहेत. म्हणूनच गौतमनगर परिसरातील रहिवाश्यांची आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जावी,नागरिकांमध्ये कोरोना बाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि त्यांनी आरोग्याबाबत काळजी घेता यावी, यासाठी येथील माजी उपनगराध्यक्ष दिपकभाऊ वाघमारे आणि पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांनी गौतमनगरवासियांसाठी ‘थर्मल मशीन’ व ‘पल्स आॅक्सीमिटर ‘ स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. त्याचे लोकार्पण दिपकभाऊ वाघमारे यांच्या हस्ते साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे व डाॅ. निपुण सोनवणे यांच्या उपस्थितीत झाले. गावातल्या नागरिकांसाठी स्वखर्चाने वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी डाॅ. निपुण सोनवणे (मुंबई) यांनी नागरिकांची थर्मल टेस्ट घेऊन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन सोनवणे, राजेंद्र बागुल, राजू वाघमारे यांची उपस्थिती होती. दरम्यान, कुणालाही थर्मल स्कॅनिंग करावयाची असल्यास त्यांनी दिपकभाऊ वाघमारे यांच्यासोबत संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content