आता व्यवस्था पाहूनच गृहविलगीकरणाचा निर्णय

 

मुंबई : वृत्तसंस्था । आता गृहविलगीकरणात राहू इच्छिणाऱ्या रुग्णाच्या घरी विलगीकरणाची व्यवस्था आहे की नाही याची पडताळणी करण्यात येणार आहे.

 

अटीसापेक्ष रुग्णांना मोठ्या संख्येने गृहविलगीकरणात राहण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या रुग्णांमुळे कुटुंबातील अन्य सदस्यही बाधित होत असल्याचे प्रकार वाढत आहेत.  त्याचबरोबर दर दिवशी गृहविलगीकरणातील किमान १० टक्के रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याचे निर्देश वैद्यकीय पथकांना देण्यात आले आहेत.

 

त्रुटी दूर करण्यासाठी गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी नव्या सूचनांचा समावेश असलेली सुधारित नियमावली प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली. तसेच प्रसूतिकाळ दोन आठवड्यांवर आलेल्या गर्भवती महिलांना गृहविलगीकरणाची मुभा देऊ नये, असेही या नियमावरील स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मुंबईत  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या बाधितांची (एसिम्प्टोमॅटिक) व सौम्य लक्षणे असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांना बहुतांशी घरी विलगीकरण करून औषधोपचार दिले जातात. गृहविलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्या मोठी असल्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांसह वैद्यकीय मंडळी आणि रुग्णशय्यांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नियंत्रण कक्ष यांच्यासाठी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केलेल्या विविध सूचना समाविष्ट असलेले सुधारित परिपत्रक कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित केले आहे.

 

प्रौढ व सहव्याधी असलेले रुग्ण ज्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळत नाहीत अशा रुग्णांना वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्षणे नसलेले बाधित (एसिम्प्टोमॅटिक) किंवा सौम्य लक्षणे असलेले बाधित म्हणून निर्देशित करणे आवश्यक असेल. स्तनदा मातांच्या बाबतीत वैद्यकीय तज्ज्ञ व नियमित कौटुंबिक चिकित्सक यांच्या विचारविनिमयानुसार योग्य निर्णय घेतला जाणार.

 

 

 

’ रुग्णांच्या घरी स्वत:ला वेगळे करून घेण्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसाठीही विलगीकरणाच्या पुरेशा सुविधा असाव्यात.  रुग्णासाठी खेळती हवा असलेली खोली व स्वतंत्र प्रसाधनगृह असावे.’ रुग्णाने कुटुंबातील इतर सदस्यांपासून विशेषत: सहव्याधी असलेली ज्येष्ठ मंडळी यांच्यापासून स्वत:ला दूर ठेवावे.गृहविलगीकरणात राहून केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन केले जाईल, याबाबत रुग्णाकडून लेखी घ्यावे.. कार्यवाहीला सहकार्य न केल्यास रुग्णाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी.

Protected Content