आता फक्त केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा


जालना: वृत्तसंस्था
। कोरोना प्रतिबंधात्मक लस महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी कोल्डचेन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण यासह सर्व कामे पूर्ण झाली आहेत. आता केंद्र सरकार आणि भारताचे औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची आम्ही वाट पाहतोय’, असे आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

 जालना येथे टोपे पत्रकारांशी बोलत होते.देशातील पाच औषध कंपन्या लस तयार करण्याचे काम करत आहेत. सीरम इन्स्टिट्युटमध्ये उत्पादित झालेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची भारतात साडेबारा हजार लोकांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे संपूर्ण जगात साधारण पस्तीस हजार लोकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. मी स्वतः सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली आहे, असेही टोपे यांनी नमूद केले.

रक्तदानाबाबतही राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. रक्तदान करण्यात युवावर्ग नेहमी पुढे असतो. त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन मी करत आहे. त्याचवेळी आपण सगळ्यांनीच रक्तदान केले पाहिजे. कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची मोठी आवश्यकता निर्माण होत आहे. त्यामुळेच रक्तदान ही निकड बनली आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

लसीकरणासाठी प्रशासन स्तरावर सज्जता ठेवण्यात आली असताना २०२१ उजाडण्याआधी भारतात प्रत्यक्षात लसचा वापर सुरू करण्यास परवानगी मिळेल, असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. सीरम इन्स्टिट्युटने कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाची पावले टाकायला सुरुवात केली आहेत. ईमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्यात यावी म्हणून सीरमने भारताच्या औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. फायझरनेही त्यांची लस भारतात वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे भारत बायोटेकनेही अशा परवानगीसाठी अर्ज केला आहे.

Protected Content