Home Cities जळगाव आता प्रत्येक बुधवारी पाळला जाणार ‘नो-व्हेईकल डे’; महापौर दिपमाला काळे

आता प्रत्येक बुधवारी पाळला जाणार ‘नो-व्हेईकल डे’; महापौर दिपमाला काळे


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी आणि शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेत आता प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जळगाव शहराच्या महापौर दिपमाला काळे यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, यामुळे शासकीय वर्तुळातून पर्यावरण रक्षणाचा एक नवा संदेश दिला जाणार आहे.

सध्या जागतिक पातळीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई भासत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर इंधनाचा अत्यंत काटकसरीने वापर करणे आणि वाढत्या प्रदूषणापासून जळगाव शहराचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंधनाअभावी शासकीय वाहनांचा वापर मर्यादित आणि काटकसरीने करण्याच्या सूचना सर्वच पातळ्यांवर दिल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत देशातील अनेक मान्यवरांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली असून, इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढवला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जळगाव मनपा प्रशासनाने शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या मोहिमेच्या यशस्वी नियोजनासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दर बुधवारी कार्यालयात येण्या-जाण्यासाठी विविध पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी बुधवारी वैयक्तिक पेट्रोल किंवा डिझेल गाड्यांचा वापर टाळून सायकल अथवा इलेक्ट्रॉनिक वाहनांचा (ई-बाईक्स) वापर करावा, असे आदेशात म्हटले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना हे शक्य नाही, त्यांनी बस सेवा किंवा ऑटो रिक्षा यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देणे बंधनकारक राहील. तसेच एकाच मार्गावर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ‘व्हेईकल शेअरिंग’ म्हणजेच वाहन भागीदारीचा पर्याय निवडावा, जेणेकरून एकाच गाडीतून अनेक जण प्रवास करू शकतील आणि इंधनाची मोठी बचत होईल. जळगाव मनपाने यापूर्वीही अशा प्रकारचे पर्यावरणपूरक धोरण राबवून राज्यात आदर्श निर्माण केला होता. आताची इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची तातडीची गरज पाहता, या ‘नो-व्हेईकल डे’ मोहिमेची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.


Protected Content

Play sound