मुंबई : वृत्तसंस्था । रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याचं ते म्हणाले आहेत.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या गुन्ह्यात रायगड पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कारवाईचा विरोध करत ट्विट केलं आहे. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.
अर्णब गोस्वांमी यांनी १० पोलीस कर्मचारी घरात घुसले आणि घराबाहेर येण्यासाठी जबरदस्ती करत धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.