जळगाव, प्रतिनिधी | कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या न्याय मागण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांनी अजिंठा विश्रामगृहात झालेल्या आजच्या बैठकीत घेतला आहे.
कोविड काळात निर्माण झालेल्या भयावह स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात टाकून कंत्राटी स्वरूपात रुग्णसेवा करणारे शासकीय कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, परिचारिका,परिचर, आया, वॉर्डबॉय, कक्षसेवक, लॅब टेक्नीशियन, बेड सहाय्यक, फार्मासिस्ट, डाटाएंट्री ऑपरेटर, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, रुग्णवाहिका चालक आदी कोरोना योद्धा यांना कोविडचा प्रभाव कमी झाला असल्याचे कारण देत शासनाने सेवेतून कमी करत अन्याय केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत आम्ही शासनाला सहाय्य करुन कोरोना निवारण्यासाठी प्रयत्न केल्याने आम्हाला शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी कोरोना योद्ध्यांनी राज्यभर लढा पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील आझाद मैदानावर महामारी योद्धा संघर्ष समितीने बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा व समर्थन दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील कोरोना योद्धा जनक्रांती मोर्चा या संघटनेने जिल्ह्यातील कोरोना योद्धयांची आज बैठक घेतली. अध्यक्षस्थानी-महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष- मुकूंद सपकाळे होते. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक-भारत ससाणे यांनी कोरोना योद्धयांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, अत्यंत कठीण परिस्थिती असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धा यांना कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शासनाने सेवेतून कमी करून अन्याय केला आहे. या सर्वच कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन शासनाने त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.असे सांगून कोरोना योद्ध्यांनी एकजुटीने आपली ताकद दर्शविण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी जळगांव जिल्ह्यातील ५०० कोरोना योद्धा मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला. या बैठकीला छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे , कादरिया फाऊंडेशनचे- शे.फारूख कादरी, डॉ.सिद्धार्थ चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे-युवक अध्यक्ष-निलेश बोरा, युवराज सुरवाडे, वाल्मिक सपकाळे, दिलीप सपकाळे, सुरेश भालेराव,दिलीप सपकाळे,पवन शिरसाळे, प्रमोद माळी, खुशाल सपकाळे, चिराग रडे, निता कामळसकर, ललिता पवार, दिपाली भालेराव,सोनल बारेला, शिला बिऱ्हाडे, काजल वाघ, सोनाबाई धनगर, प्रतिक चौधरी,कमलेश वाणी,सुनिल परदेशी,अजय सैंदाणे,रमेश वानखेडे,रामकृष्ण पाटील,प्रेमराज वानखेडे,मनोज सावकारे,धनलाल चव्हाण,प्रशांत कोळी,पितांबर अहिरे, युगल जावळे, सागर चौधरी,हर्षल देवकर,विनायक किरंगे,अमोल बाविस्कर;समाधान शिंगटे यांच्या सह जिल्ह्यातील कोरोना योध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.