वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) आम्ही चीनवर नाराज आहोत. जे काही घडले ते चुकीचे आहे. चीनने हा विषाणू आपल्याच देशात थोपवायला हवा होता. त्याबाबत तात्काळ पावले उचलायला हवी होती. सध्या सुरू असलेल्या घडामोडींकडे जर्मनी प्रमाणेच आमचेही लक्ष आहे. आकडा ठरलेला नाही. पण आम्ही जर्मनीपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून मागण्याचा विचार करत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीसाठी चीन जबाबदार असल्याक हे जगातील बहुतांश देशांचे मत झाले आहे. त्यामुळेच चीनकडून आर्थिक भरपाई वसूल करण्याचा काही देशांचा विचार सुरू आहे. जर्मनी चीनकडून १६५ अब्ज डॉलरची भरपाई मागणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी थेट काही बोलण्याचे टाळले. मात्र, चीनवर कठोर शब्दांत टीका केली. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी आम्ही अद्याप अंतिम रक्कम निश्चित केलेली नाही. मात्र ती बऱ्यापैकी पुरेशी असेल, असे सांगत चीनकडे नुकसान भरपाई मागणार असल्याचे स्पष्ट संदेश दिले आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जगाचे नुकसान झाले आहे. अमेरिकेलादेखील खूप मोठा फटका बसला आहे. यासाठी चीनला जबाबदार धरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या आम्ही या संदर्भात अतिशय गंभीरपणे तपास करत आहोत, असेही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, चीनकडून उगाच राजकारण करु नका. ही सगळी ऊर्जा लोकांचा जीव वाचवण्यासाठी सांभाळून ठेवा, असं म्हटले आहे.