पाटणा (वृत्तसंस्था) बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने केलेल्या गोळीबारात चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाल्याची घटना बिहारच्या कैमुरमध्ये घडली आहे. या गोळीबारानंतर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.
कैमुर येथील चैनपूरच्या मदूरना गावातील पिडीत महिलेचा घटस्फोट झाला असल्याने ती वडिलांच्या घरा राहत होती. काही महिन्यांनी तिचे गावातील एका तरुणाशी प्रेम-संबंध जुळले. मात्र, तिच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. घरच्यांचा विरोधाला न जुमानता पिडीत महिलेने त्या तरुणाशी लग्न केले. संबंधित महिला नेहमीप्रमाणे मंगळवारी कामावरून घर परतत होती. गावात पोहोचताच तिच्या भावाने तिच्यावर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात पीडिता आणि तिची दोन वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र इथे त्या चिमुकलीचा उपचारापूर्वीच मुत्यू झाला.