अहो आश्चर्यम…! : केळीच्या एका खोडाला आलेत चार कमळफुलें (कंबय) व ४ घड

जळगाव तुषार वाघुळदे । निसर्गाच्या चमत्कारापुढे आश्चर्यचकित व्हावे, अशा अनेक अविश्वसनीय घटना वारंवार अनुभवास येत असतात.निसर्गाच्या विविध कला कोणत्या रुपात पाहायला मिळतील, ही कल्पना करणेच कठीण आहे. सजीवसृष्टीत मानवाला अचंब्यात टाकणाऱ्या अशा अनेक घटना याआधीही घडलेल्या आहेत. अशीच एक घटना रावेर तालुक्यातील उटखेडा या गावातील प्रगतिशील शेतकरी प्रशांत प्रल्हाद महाजन यांच्या केळीच्या मळ्यात अनुभवायला आली. रावेरपासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर त्यांची बागायती आहे.

केळीच्या एका खोडाला चक्क चार कमळफुले (कंबय) व त्यातून चार घड उगवून आली आहेत. वाढीत असलेले या चार घडांपैकी दोनची वाढ नेहमीप्रमाणे होत असल्याचे दिसत आहे, निसर्गाने दाखवलेल्या या चमत्काराबद्दल शेतकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे व हे खोड आणि घड पाहण्यासाठी उत्सुकताही वाढत आहे. अनेक जणांनी हा अद्भूत चमत्कार पाहण्यासाठी गर्दी केली होती. तसेच केळी संशोधकांसाठी सुद्धा हे आव्हानात्मक मानले जात आहे. श्री.महाजन यांच्याकडे 18 एकर शेती आहे, अत्यंत कष्टाळू असलेला हा ‘ शेतकरी राजा ‘ बागायती बरोबरच विविध प्रकारची पिके घेत असतो. आयटीआय प्रयन्तचे शिक्षण घेऊन नोकरी न करता काळ्यामातीत रमणारे महाजन हे प्रयोगशील व कृतिशील व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी ” लाईव्ह ट्रेंड्स न्यूज ” शी बोलताना सांगितले की, शेतात मी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करत असतो. केळीचे ग्रॅड ९ जातीचे टिश्यू ( रोप ) हे मध्यप्रदेशातील बडवानी येथील ‘रेव्हा फ्लोरा’ या कंपनीतून खरेदी केले, लॉकडाऊनमुळे केळीचे दर एक हजार रुपयांवरून तीनशे ते साडेतीनशे क्विंटल रुपये प्रयन्त आले. खर्चही निघत नाही, असे ते म्हणाले.

कृषीविषयक विविध उत्पादनांमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत.त्यादृष्टीने एकाच खोडाला एका पेक्षा जास्त घड आणणे शास्त्रीय पद्धतीने शक्य आहे का? व ते परिपूर्ण वाढ होईपर्यंत टिकते का ? हे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे महत्वाचे ठरेल, असे झाले तर शेतीमध्ये नक्की एक क्रांती घडून येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या आजच्या आश्चर्याला भविष्यातील केळी उत्पादनातील क्रांतीची नांदीच राहील असे मत व्यक्त होत आहे. केळीच्या झाडाला चार केळफूल व चार घड हे आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच पहावयास मिळाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय ठरला आहे. गेल्या नऊ वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याकडेही असा चमत्कार झाल्याचे ऐकिवात आहे. एका जणाने म्हटलंय,

निसर्गाची रीत न्यारी
चमत्कार तो करितो
भव्य दिव्यता दाखवूनी
अस्तित्व त्याचे भासवितो..!!

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3107993285975239/

Protected Content