अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करत अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, असं आवाहन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडावा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा राजधर्म पाळणं म्हणजे या आंदोलनात बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली असेल, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अहंकारी सरकार सत्तेत आलं आहे. शेतकऱ्यांच्या वेदनाही हे सरकार समजून घेण्यास तयार नाही तिथे सामान्य जनतेची काय बिशाद? कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आतापर्यंत ५० शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्यातील काही जणांनी सरकारविरोधातील संतापातून आत्महत्या केली आहे, तर काहीचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोदी सरकार हे भांडवलदार धार्जिणे असल्याचा आरोप केला. काही ठरावीक उद्योजकांना लाभ पोहोचवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. पण लक्षात ठेवा, लोकशाहीत लोकांचं न ऐकणारे लोक अधिक काळ सत्तेत राहत नाहीत. लोकशाहीचा अर्थ शेतकरी आणि मजुरांच्या हिताचं रक्षण करणं आहे, हे सरकारला समजलं पाहिजे, असं सांगतानाच थंडीपाठोपाठ आता दिल्लीत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या महिला, पुरुष आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, याकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं.

Protected Content