जळगाव, प्रतिनिधी | तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून अवैध वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात निष्पाप नागरिकांचा बळी जात असून अशा अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होत असल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी जात आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या घटनेची दखल घेऊन अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून निष्पाप नागरिकांचा बळी जाणार नाही व शासनाचा महसूलही बुडणार नाही. मागील तीन दिवसांपासून ट्रॅक्टर थेट रिक्षात जाऊन घुसले तर काल बुधवारी महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूचा डंपर नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिपरीचारिका प्रेरणा देविदास तायडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आज गुरूवारी पहाटे कानळदा रोड येथे कार आणि ट्रॅक्टरच्या धडकेत कारमधील दोन जण जागीच ठार झाले आहे. अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत अवैध वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने ट्रॅक्टर व डंपरवर धडक कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, उपाध्यक्ष प्रताप बनसोडे, महानगर युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, महानगर उपाध्यक्ष विक्रम शेजोळे, महानगर उपाध्यक्ष अनिल लोंढे, विशाल महाले यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2704930959801903