जळगाव, प्रतिनिधी । अवयवदान हि संकल्पना लोकांनी समजून घ्यावी. अवयवदानाचे विचार जनमानसात रुजले पाहिजे. लोकांमधील अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर झाले पाहिजे. अवयवदानामुळे अनेक लोकांना जीवनदान देता येते, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छाया किडनी केअर आणि रिलीफ फाउंडेशन आणि सुखकर्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. प्रसंगी मंचावर उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. नरेंद्र ठाकूर उपस्थित होते.
प्रस्तावनेतून डॉ. अमित भंगाळे यांनी अवयवदानाची आवश्यकता आणि कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. प्रसंगी अवयवदान करणारे धनराज फुलचंद ललवाणी, मंगला दिगंबर कोल्हे यांचा सत्कार अधिष्ठात्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ‘मिस्टर किडनीवाला’ या ई मासिकाचे प्रकाशन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. तसेच, डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी त्यांचा देहदानाचा फॉर्म भरून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी पीपीटीद्वारे अवयवदानाचे महत्व डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. अवयवदानाविषयी असलेले गैरसमज आणि शास्त्रोक्त माहिती त्यांनी सांगितली. यावेळी विद्यार्थी श्रीकांत केदार यानेही मनोगत व्यक्त केले. अवयवदान जनजागृतीबाबत रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनां गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाचा उपक्रम वाढीस लागावा यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी अवयवदान करण्याबाबत शपथ घेतली.
सूत्रसंचालन लीना लेले यांनी तर आभार डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मानले. स्पर्धांचे परीक्षण डॉ. अंजली वासडीकर, डॉ. शैला पुराणिक यांनी केले. यावेळी डॉ. गीतांजली ठाकूर, डॉ. नेहा भंगाळे, किशोर सूर्यवंशी, मुसा शेख, डॉ. संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.