अवघ्या २ किमीसाठी ८ हजार ५०० रुपयांची मागणी ; दिल्ली पोलिसांकडून रुग्णवाहिका जप्त

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  अवघ्या २ किमी अंतरासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना वेठीस धरून  ८ हजार ५०० रुपयांची मागणी करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला झटका देत दिल्ली पोलिसांकडून रुग्णवाहिका जप्त करण्यात आली आहे

 

देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यात रुग्णांची लूट होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शन असो की ऑक्सिजन सिलेंडर सर्वच ठिकाणी लूट सुरु असल्याचं दिसत आहे. रुग्णालयांची बिलंही लाखोंच्या घरात येत असल्याने सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशातच दिल्लीत रुग्णांची लूट करण्याऱ्या रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी दणका दिला आहे. अवघ्या दोन किलोमीटर अंतरासाठी त्याने रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरलं होतं.

 

रुग्णाला अपोलो रुग्णालयातून होली फॅमिली रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आलं होतं. हे अंतर अवघ्या दोन किलोमीटर इतकंच आहे. यासाठी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेचा बंदोबस्त केला. मात्र त्या रुग्णवाहिका चालकाने या दोन किलोमीटर अंतरासाठी ८,५०० रुपयांची मागणी केली. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही मानायला तयार नव्हता. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात त्यांनी तात्काळ घटनास्थळी येत रुग्णवाहिका चालकाला अटक केली. तसेच त्याची रुग्णवाहिकाही जप्त केली आहे.

 

 

दिल्ली पोलिसांनी यासाठी एक हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोणत्याही प्रकारची लूट होत असल्यास फोन करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. जास्त पैसे उकळणे, कोरोनाची खोटी औषधं देणे, उपकरणांचा काळाबाजार करणे यासारख्या समस्यांना सामोरं जात असल्यास तक्रार करण्याची विनंती केली आहे.

 

 

कोरोना संकटात एकमेकांना मदतीचा हात देण्याऐवजी सर्रास लूट सुरु असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे अधिच संकाटात सापडलेले रुग्णांचे नातेवाईक हवालदिल होत आहे.

 

Protected Content