Home आरोग्य मृत्यूला हरवून तरुणाचा पुनर्जन्म; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी उपचार

मृत्यूला हरवून तरुणाचा पुनर्जन्म; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील यशस्वी उपचार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जीवन संपविण्याचा प्रयत्न केलेल्या २१ वर्षीय तरुणाचा जीव वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला यश आले असून या यशस्वी उपचारामुळे एका तरुणाला अक्षरशः नवजीवन मिळाले आहे. वैद्यकीय कौशल्य, कुटुंबीयांची सतर्कता आणि वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेला हा तरुण पुन्हा आयुष्याकडे परतला आहे.

सावदा येथील भूषण पाटील (वय २१) या तरुणाला मागील काही वर्षांपासून मद्यपानाची सवय लागली होती. त्यातून त्याच्या वर्तनात बदल जाणवू लागले होते. घरच्यांशी संवाद टाळणे, एकटेपणा स्वीकारणे आणि मानसिक तणाव वाढत जाणे, या पार्श्वभूमीवर त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच त्याच्या बहिणीने प्रसंगावधान राखत तत्काळ त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला त्वरित एमआयसीयूमध्ये हलविण्यात आले. यानंतर एमआयसीयू प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचारांची सूत्रे हाती घेतली.

डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. विनय बुराडकर, डॉ. ललितकुमार, डॉ. ओमप्रकाश काकडे, डॉ. आसावरी देशपांडे, डॉ. सौरभ मुळे, डॉ. तन्मय मेहता आणि डॉ. लुसी थॉमस यांच्या पथकाने अत्यंत दक्षतेने उपचार सुरू केले. रुग्णाची स्थिती चिंताजनक असल्याने तब्बल सात दिवस त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.

या काळात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी रुग्णावर सातत्याने लक्ष ठेवत उपचार केले. योग्य औषधोपचार, सतत निरीक्षण आणि वैद्यकीय टीमच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे रुग्णाने हळूहळू प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. प्रकृतीत सुधारणा होताच त्याला व्हेंटीलेटरवरून काढण्यात आले आणि पुढील उपचार सुरू ठेवण्यात आले.

सध्या भूषण पाटील यांची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या यशस्वी उपचारांनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून रुग्णालयातील सेवाभावी आणि तत्पर वैद्यकीय यंत्रणेचे कौतुक होत आहे.

या घटनेत एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही पुढे आला आहे. मानसिक तणाव, व्यसनाधीनता आणि एकटेपणा यामुळे अनेक तरुण टोकाचे निर्णय घेत असल्याने कुटुंबीयांनी संवाद वाढवणे, भावनिक आधार देणे आणि गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले.

निवासी डॉक्टर डॉ. ललितकुमार यांनी सांगितले की, या प्रकरणात बहिणीने दाखवलेली तत्परता रुग्णाचा जीव वाचवण्यात निर्णायक ठरली. योग्य वेळी उपचार मिळाल्यास गंभीर अवस्थेतूनही रुग्णाला वाचवता येते, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केले.

 


Protected Content

Play sound