अल्‍कोहोलमुळे कोरोना घश्यातच मरेल, दारूची दुकाने सुरू करा; राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना आमदाराचे पत्र

जयपूर वृत्तसंस्था । अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग दारुचे सेवन केल्यावरही कोरोनाचा विषाणू घशातच मरेल. त्यामुळे राज्यातील दारुची दुकाने सुरु करावीत. अशी मागणी राजस्थानमधील एका आमदाराने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र पाठविले आहे.

सांगोड मतदारसंघाचे आमदार भरतसिंह कुंदनपूर यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझर्सनी कोरोना नष्ट होत असेल तर मग दारुचे सेवन केल्यावरही कोरोनाचा विषाणू घशातच मरेल. त्यामुळे राज्यातील दारुची दुकाने सुरु करावीत. दारूची दुकाने बंद राहिल्याने उलट मद्याचा काळाबाजार वाढला आहे. ही दुकाने सुरु झाल्यास सरकारला महसूलही मिळेल, असे भरतसिंह यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी आमदार बलवान सिंह पुनिया यांनीही मुख्यमंत्री यांच्याकडे अशीच मागणी केली होती. दारुची दुकाने बंद राहिल्याने या उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच लोकांच्या आरोग्यवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचा दावा पुनिया यांनी केला होता. राजस्थानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २ हजार ६१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या जयपूरमध्ये ३४ बळी गेले आहेत.

Protected Content