जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुने जळगावातील रामपेठ येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या एका तरूणाला अटक केली आहे. शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील जुना नशिराबाद रोड परीसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या विधवा आई, आजी, मोठी बहीण व भावासोबत राहते. अल्पवयीन मुलगी हा टिकटॉकवर व्हिडीओ तयार करत असते. २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सर्वजण जेवण करून घराच्या बाहेर असलेल्या ओट्यावर सर्वजण बसले होते.
त्यावेळी एका कार त्यांच्या घरासमोर थांबली. कारमध्ये संशयित आरोपी राहूल भिका जोहरी (वय-२१) ( रा. चिंचखेडा ता. जामनेर ) आणि इतर अनोळखी तीन मुले आणि एक महिला बसलेले होते. यातील दोन मुले आणि अल्पवयीन मुलीशी गप्पा करत होते. अल्पवयीन मुलीची आईसह सर्वजण पुन्हा घरात गेले. त्यानंतर अल्पवयीन मुलगी दिसून आली नाही. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळून आली नाही. दरम्यान चार मुली आणि एक महिलेने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी पथक तयार करून गुप्त माहिती मिळाल्यानुसार पथक जामनेरला रवाना केले. संशयित आरोपी राहूल जोहरी हा अल्पवयीन मुलीला राहत्या घरी चिंचखेडा येथे घेवून गेला. ही माहिती राहूलच्या वडील भिका दामोदर जोहरे यांना समजल्यानंतर त्यांनी शनीपेठ पोलीसांना माहिती दिली. अल्पवयीन मुलगी ही जामनेरला असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीसांचे पथक चिंचखेडा रवाना झाला. बुधवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेवून संशयित आरोपी राहूल जोहरी याला अटक केली आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात राहूल जोहरी यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये आणि पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.