अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर खून केल्या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डांभुर्णी गावातील मुलीचे लग्न भोकर गावातील मुलाशी 12 मार्च 2020 रोजी गावात लागणार होते. त्यादिवशी मुलीकडून आलेल्या पाहुण्यात आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील हा सुद्धा भोकर गावी आलेला होता. तेव्हा त्याची गावातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख होऊन त्याला तो गावातील शेतात संडासला जायचे म्हणून घेऊन गेला व त्याठिकाणी त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक संभोग करून त्या मुलाला मारून टाकले. अल्पवयीन मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलीस स्टेशनला त्यांच्या मुलाचे अपहरण केल्याबाबतची फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून तपास सुरु असतांना मुलाचे प्रेत दि.16/03/2020 रोजी मिळुन आल्यामुळे त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून केला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याच दिवशी आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील याला अटक केली.
तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून दि.10 जून 2020 रोजी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस.जी.ठुबे यांच्याकडे एकूण 12 साक्षीदार तपासले.
यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. निलेश देवराज,लक्ष्मण सातपुते – ना.तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या तसेच खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयाच्या युक्तिवादातून मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एस.जी.ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा यांच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी आजन्म मरे पर्यंतची शिक्षा दंडासह सुनावली. सदर खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.

Protected Content