पुणे : वृत्तसंस्था| केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. अर्थव्यवस्थेसंबंधी योजना असती तर कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे दरवर्षी होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. अनुयायांना घऱातूनच अभिवादन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचं आम्ही मानतो असं सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “एकंदरीत लोकं काय निर्णय घेतला पाहिजे ते सांगत आहेत. पण शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत”.
“मुंबई किंवा पुण्यातील लोकल आतापर्यंत सुरु व्हायला हवी होती. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं दिसत आहे, करोनानंतर फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही,” असंही यावेळी ते म्हणाले