यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील घटना ताजी असतांना तालुक्यातील न्हावी शिवारात दुसऱ्या प्रौढाच्या अंगावर वीस कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. तालुक्यातील ही दुसरी तर जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.
हमीद रूबाब तडवी (वय-४७) रा. न्हावी ता. यावल असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हमीद तडवी हे न्हावी शिवारातील जानोरी जंगलात खारबर्डी धरणाच्या पाटचारी जवळ आज शुक्रवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गुरे चारत होते. हमीद तडवी पाटचारीत पाणी पीत असतांना त्यांच्या पायाजवळ वीज कोसळली त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीने ओरडा ओरड केल्याने परिसरातील शेतकरी व मजूर जमा झाले. त्यांनी तातडीने त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी हबीब तडवी रा. फैजपूर यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे, श्रीकांत इंगळे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दुपारी १ वाजेच्या सुमारास एका गुरे चारणाऱ्या व्यक्तीचा विज पडून मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतांना सायंकाळी न्हावी येथे दुसऱ्या व्यक्तीचा देखील वीज पडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.