अमेरिकेत मिंक प्राण्यांनाही कोरोनाचा संसर्ग

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत. मानवी समुदाय कोरोनाच्या संसर्गामुळे हतबल असताना दुसरीकडे प्राण्यांवरही कोरोनाचा परिणाम होत आहे. अमेरिकेत १२ हजार मिंक प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेतील उटाह आणि विसकॉन्सिन येथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित मिंक आढळले आहेत. उटाहमध्ये १० हजार मिंक प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. पशू वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. डीन टेलर यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा मिंक प्राण्यात संसर्ग आढळला होता. जुलै महिन्यात मिंक फार्ममध्ये काम करणारे काही कर्मचारी आजारी पडले असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेत जानेवारी महिन्यात पहिल्या बाधिताची नोंद करण्यात आली होती. डॉ. डीन टेलर यांनी सांगितले की, संसर्ग माणसांमधून प्राण्यांमध्ये पसरला आहे. उटाहमधील परिस्थिती पाहता असा दावा करणे योग्य राहील. विस्कोन्सिनमध्येदेखील जवळपास दोन हजार मिंक प्राणी मृत झाल्याचे आढळले आहेत. या घटनेनंतर आता दोन्ही राज्यातील मिंक प्राण्यांचे अनेक फार्म वेगळे करण्यात आले आहेत.

मिंक प्राण्याची कोरोना चाचणी करता येऊ शकत नाही. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये मिंक पालनाचा व्यवसाय केला जातो. विस्कोन्सिन हे फरचे उत्पादन करणारे अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे. विस्कोन्सिनमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे.

अमेरिकेत वाघ, सिंह, मांजर आणि श्वानांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. एका प्राणिसंग्रहालयातील वाघिणीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. नेदरलँड्समध्येही मिंक प्राण्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. मिंक प्राण्यांच्या केसांपासून फरच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. त्यासाठी मिंकचे पालन करणारे फर्म्स अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर आहेत.

Protected Content