वाशिंग्टन : वृत्तसंस्था । संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट असताना आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
यापूर्वी २००३ साली अमेरिकेत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने ही माहिती दिली आहे. मंकीपॉक्सबाधित व्यक्तीला डल्लासमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रुग्णांने नायजेरियातून अमेरिकेत प्रवास केला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मंकिपॉक्सचा संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वैद्यकीय यंत्रणा तपासणी करत आहेत. हा रुग्ण ज्या विमानाने अमेरिकेत आला, त्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. रुग्णाने दोन विमानं बदलत अमेरिकेत प्रवेश केला होता. ८ जुलैला नायजेरियातील लागोसमधून अटलँटामध्ये आणि ९ जुलैला अटलँटामधून डल्लासमध्ये प्रवेश केला होता. सध्यातरी मंकिपॉक्सबाबत चिंता करण्याचं कारण नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मंकीपॉक्स हा साथीचा आजार आहे. १९७० साली पहिल्यांदा मंकीपॉक्सच आजाराचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत माहिती दिली आहे. आफ्रिकेतील ११ देशात या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर २००३ साली पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १८ वर्षांनी मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. २००३ साली घानावरून मागवण्यात आलेल्या पाळीव कुत्र्यामुळे अमेरिकेत संसर्ग पसरला होता. आतापर्यंत आशिया खंडात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
मंकीपॉक्स झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने संक्रमण होतं. मात्र याबाबत अजूनही वैज्ञानिकांना स्पष्ट माहिती नाही. मंकीपॉक्सची लागण ६ ते १३ दिवसात होते. काही लोकांना ५ ते २१ दिवसातही संसर्ग होण्याची शक्यता आहे. लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये दुखापत होते. त्याचबरोबर थकवा जाणवतो. त्याचबरोबर आजारी व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यावरही प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यूचं प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत असू शकतं. तर लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे.
मंकीपॉक्सवर आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. लसीमुळे मंकीपॉक्स आटोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता असणं महत्त्वाचं आहे.