अमेरिकी लष्कराला मदत करणाऱ्या अफगाणींची तालिबान्यांकडून झाडाझडती

 

काबुल : वृत्तसंस्था । अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हातात घेतल्यानंतर गेली २० वर्षे अमेरिकन सैनिकांना साथ देणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे.

 

दहशतवादी घराघरात जाऊन अमेरिका, ब्रिटिश आणि नाटो सैनिकांना मदत करण्याऱ्या अफगाण नागरिकांचा शोध घेत आहेत. मदत करणारे लोक पुढे आले नाहीत, तर कुटुंबियांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या गोपनीय अहवालात याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.

 

तालिबानचे दहशतवादी अमेरिका आणि नाटो सैनिकांना मदत करण्याऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या घरी जाऊन तपास केला जात आहे. दहशतवाद्यांकडे काही लोकांची यादी आहे. ही लोकं सैनिकांना मदत करत होती याची माहिती त्यांनी मिळवली आहे. जर ही लोकं शरण आली नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांना मारण्याची किंवा अटक करण्याची धमकी देण्यात आली आहे, असं संयुक्त राष्ट्राच्या विशेष तज्ज्ञांच्या समितीने दिलेल्या गोपनीय अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 

दुसरीकडे जलालाबादमध्ये स्थानिक नागरिकांनी तालिबानऐवजी अफगाणचा झेंडा फडकवत विरोध दर्शवला होता. एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावर संतापलेल्या तालिबानने गर्दीवर गोळीबार केला. यात अनेक जण जखमी झाले आहेत.

 

तालिबानने काबूलवर ताबा मिळवत अफगाणिस्तान आपल्या अमलाखाली आल्याचे म्हटले आहे. मात्र अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अशा काही जागा आहेत जिथे तालिबान्यांना अद्याप पोहोचता आलेलं नाही. अफगाणिस्तानातील पंजशीर व्हॅलीचा भाग अशाच ठिकाणांपैकी आहे. तालिबानला पंजशीर व्हॅलीवर विजय मिळवणे कठीण जात आहे. आताही पंजशीर व्हॅली तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभे आहे. अमरूल्लाह सालेह पंजशीरमध्येच आहेत. तालिबानच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी सालेह यांनी पंजशीर व्हॅलीचा भाग निवडला आहे. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.

Protected Content