नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे.
भारतात दोन महिन्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतात कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे. त्यामुळे भारताला कोरोनाविरोधातलं युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.
जगभरात कोरोनाचं संकट गेल्या वर्षभराहून अधिक काळ थैमान घालत आहे. जगातल्या प्रत्येक देशाला फटका बसला आहे. गेल्या वर्षी ८ त ९ महिने जगाला वेठीला धरल्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीपासून कोरोनानं थोडी उसंत घेतली होती. या काळात लस देखील आल्यामुळे कोरोनाविरोधातल्या लढाईत मोठी मदत मिळू लागली. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनानं उचल खाल्ली असून भारतात दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येनं रुग्ण वाढून मृत्यू होऊ लागले आहेत. त्यामुळे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड, पुरशी आरोग्य व्यवस्था यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच व्यापक लसीकरण सुरू असल्यामुळे भारताला लसींचा देखील तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातल्या अनेक देशांनी भारताला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून शत्रुत्व निभावणाऱ्या पाकिस्तानचा देखील समावेश असल्यामुळे कोरोनासमोर खऱ्या अर्थाने जगाचं रूप वसुधैव कुटुंबकम् झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे!
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलिवन यांनी ट्वीट करून आश्वासक भाष्य केलं आहे. “भारतात रुग्णवाढीमुळे अमेरिकेला नक्कीच चिंता वाटू लागली आहे. आम्ही भारताला मदत पुरवण्यासाठी २४ तास काम करत आहोत. भारत या संकटाचा धैर्याने सामना करत आहे”, असं ट्वीट सलिवन यांनी केलं आहे.
दुसरीकडे अमेरिकेचे गृहमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी देखील ट्विटरवरून पाठिंबा दिला आहे. “ या संकटात आम्ही भारतासोबत आहोत. भारतातील लोकांसाठी आणि तिथल्या आरोग्य सेवकांसाठी आम्ही वेगाने अतिरिक्त मदत पाठवणार आहोत”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी, “कोविड-१९ शी लढा देणाऱ्या भारतीयांना मला संदेश द्यायचा आहे. या लढ्यामध्ये फ्रान् तुमच्या सोबत आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत”, असं ट्वीट केलं आहे.
युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्लस मायकेल यांनी देखील भारताला पाठिंबा दिला आहे. “युरोपियन संघ भारतीयांसोबत या लढ्यामध्ये उभा आहे. हे संकट सर्वांवरच आलं आहे. ८ मे रोजी होणाऱ्या भारत-युरोप समिटमध्ये भारताला कशा पद्धतीने मदत करता येईल, याविषयी आम्ही चर्चा करू”, असं मायकेल म्हणाले आहेत.