अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासह तीन ठिकाणं बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : वृत्तसंस्था । पोलिसांना काल रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने फोनवर दादर, भायखळा, छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जुहू येथील बंगला उडवण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली. 

या फोन नंतर त्या व्यक्तीने सांगितलेल्या सर्व ठिकाणी रात्रभर शोध घेण्यात आला मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री ९ वाजता एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्या व्यक्तीने धमकी दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे, दहशतवादविरोधी पथक, रेल्वे पोलीस, बॉम्ब शोधक आणि विल्हेवाट पथकाला कळवण्यात आले. या सर्वांनी दादर, भायखळा, रेल्वे स्थानक आणि जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या घराजवळ बॉम्बचा शोध घेतला.

जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने म्हणाले, “आम्ही अमिताभ बच्चन यांच्या चारही बंगल्यांची बाहेरून तपासणी केली. मात्र तिथे काहीही संशयास्पद आढळले नसल्याने हा कॉल खोटा आणि अफवा पसरवण्यासाठी होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांकडून एफआयआर नोंदवण्यात येत असून सायबर पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तिच्या लोकेशनची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत”.

 

Protected Content